कोरोना विरूद्धचे युद्ध !




कोरोना विरूद्धचे युद्ध ! 



       कोविड-१९च्या साथीला आपण भिडण्याची सुरूवात होउन तीन आठवडे झाल्याने या लढाईचा आतापावेतो थोडा फार प्रत्यक्ष अनुभव सर्वाना आला आहे! जगातील अनेक देशांत आज टाळेबंदी चालू असली तरी या विश्वव्यापी संकटाचे परिणाम सर्वत्र सारखे नसून ते लक्षणीयरित्या भिन्न आहेत. या घटनेची व्याप्ति आणि संभाव्य जिवित आणि जीवनहानी पाहता अनेकांनी तिची युद्ध परिस्थितीशी तुलना केली हे समजण्याजोगे आहे. पण अधिक बारकाईने विचार केल्यास या युद्धात बाह्य शत्रु नाही हे लक्षात येते. कोविदचा प्रसार चीनने गलथानपणाने किंवा दुष्टपणाने केला असा आरोप होत आहे. त्याचा शस्त्र म्हणून वापर झाला असण्याची शक्यता कमी असली तरी प्रयोगशाळेतून विषाणू चुकून निसटला असण्याची शक्यताही आहेच. मात्र या विषाणूचे विशिष्ट व्यक्ती किंवा मानवी समुहाला लक्ष्य बनविणे असे उद्दिष्ट असू शकत नाही हे सुस्पष्ट आहे.
          चक्री वादळे, टोधाड, पूर, त्सुमानी, भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमागेही मानवी समाजाला हानी पोचविण्याचे उद्दिष्ट नसतेच! पण या सर्व संकटांचा – त्यांची अचूक पूर्वसूचना मित नसली तरी - परिणाम स्थल आणि काल संदर्भात मर्यादित आणि दृश्य स्वरूपाचा असतो. भूकंप कांही सेकंदात मोठी जीवित आणि मालमत्ताहानीचे कारण बनत असला तरी त्यानंतर भूकंपग्रस्त लोकाना प्रथम त्वरित मदत पोचविणे आणि नंतर त्यांचे पुनर्वसन करणे ही आव्हाने सुस्पष्ट असतात. ही कार्ये बिन महत्वाची किंवा सोपी असतात असे नव्हे पण त्यात अनिश्चितता नसते. करोनाचे संकट अदृश्य असते. संसर्गाची सुरूवात होउन त्यांचा फैलाव झाल्यानंतर इस्पितळात मोठ्या संख्येने रूग्ण दाखल होईपर्यंत या संकटाची चाहूलही लागत नाही. साथ फैलावण्याचा वेग जास्त असल्याने कांही दिवस दबा धरुन वावरत असलेला करोना जेंव्हा प्रगट होतो तेंव्हा भूमिती श्रेणीत वाढणा-या रूग्णसंख्येच्या पूरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वाहून जाण्याची स्थिति उद्भवते. तुटपुंज्या सुविधांचे वाटप मोठ्या संख्येतील रुग्णात करण्याचे धर्मसंकट वैद्यक व्यवस्थेसमोर उभे रहाते. या स्थितीत साथ फैलावण्याचा वेग कमी व्हावा म्हणून टाळेबंदीसारखा ज़ालिम उपाय करावा लागतो. टाळेबंदीने साथ पसरण्याचा वेग कमी होतो; यातून उपलब्ध होणा-या अतिरिक्त वेळात वैद्यक व्यवस्थेची डागडूजी करण्यास सवड मिळते; मात्र रोग नष्ट होत नाही. शिवाय लोकांच्या जीवावरील संकटाचे निराकरण करण्याच्या प्रयत्नातून अर्थव्यवहार ठप्प झाल्याने त्याचे रूपांतर रोजीरोटीच्या संकटात झाल्याचा अनुभव सर्वत्र येत आहे. 
        सामान्यपणे बाह्य शत्रुचा सामना करण्यासाठी समाजातील विविध समाज घटकाना आपसातील मतभेद - तात्पुरते का असेना – दूर ठेवत युद्ध प्रयत्नाना मदत करण्याचे आवाहन सरकार मार्फत करण्यात येते. अशा प्रसंगी बहुतेक ठिकाणी सामाजिक एकोपा राखला जातो. बाह्य शत्रु दृश्य असतो. शत्रुची युद्ध उद्दीष्ठे नेहमीच स्पष्ट नसली तरी त्याबाबत होरा बांधता येतो. त्यामुळे आपल्या हद्दीतील शत्रुच्या संभाव्य लक्ष्यांचे रक्षण करत शत्रुच्या हद्दीतील आपल्या लक्ष्यांवर हल्ला करणे असा दोन्ही पक्षांचा कार्यक्रम असतो. अघोषित युद्धात परिस्थिति अधिक गुंतागुंतीची बनते पण दृश्य शत्रु (दहशतवादी लपून छपून काम करत असले तरी त्यांचे कृत्य यशस्वी झाल्यावर ते पकडले गेले
नाहीत तरी त्यांचे अस्तित्व स्पष्ट होते) आणि त्याची संभाव्य लक्ष्ये या बाबी उघड लढाईसारख्याच असतात. मात्र संभाव्य दशहतवादी संकटाचा सामना करणा-या देशाना कोणतेही लक्ष निवडू शकणा-या दशहतवाद्यांचा तपास करण्याचे कठीण काम करावे लागते. ही लढाई असमान असते कारण दशहतवाद्याना एखादे यशही पुरे असते पण त्यांचा सामना करणा-या सरकारी यंत्रणाना मात्र एखादे अपयशही घातक ठरू शकते. मात्र सामान्य जनतेचे सहकार्य आणि विश्वास सरकारला राखता/मिळवता आला तर दशहतवादाविरूद्धची लढाई सोपी बनते कारण जनसामान्याचा पाठिंबा/आसरा नसला त्यांच्या कारवायाना चटकन पायबंद लागू शकतो. कोरोना विरूद्धची लढाई मात्र याहीपेक्षा निराळी आणि जटिल ठरते. अदृश्य शत्रुशी मुकाबला करण्याचा उपाय उघड असला तरी त्याचा वापर प्रदीर्घ काळासाठी करणेही घातक ठरू शकते.  
नवी लढाई     
        नॉवेल करोना-२चा विषाणू बाह्य असला तरी त्याचा प्रसार माणसांकडूनच होतो. या साथीवर प्रतिबंधात्मक उपाय (लस/औषध) अद्याप सापडला नसल्याने सुचविले गेलेले पर्यायी उपाय – हात धुणे, मास्क वापरणे आणि समाजात वावरताना गर्दी टाणे –पूर्णपणे - वैयक्तिक आणि/किंवा सामुहिक - मानवी वर्तणूकीशी संबंधित आहेत. लस किंवा परिणामकारक औषध शोध लाग(व)णे आणि ते सर्वत्र उपलब्ध होणे ही करोना विषाणूविरोधातील आक्रमक चाल ठरेल; पण ते शस्त्र आज उपलब्ध नसल्याने सर्वच देशाना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो! त्यामुळे शत्रु बाह्य असला तरी लढाईची व्याप्ती किती/कुठे हे मानवी समाजाच्या वर्तणूकीवर अवलंबून असते. जे समाज/ अर्थव्यवस्था इतर प्रदेशांशी निगडित आहेत तिथे त्यांचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्याच प्रमाणे या साथीपासून स्वत:चा बचाव करण्याची तयारी/कुवतही ठिकठिकाणच्या (भिन्न) मानवी समाजव्यवस्था, त्यांची आचरण पद्धती आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची जागरूकता यावर अवलंबून असते आढळते.    
         कोविद-१९ च्या व्याप्ती आणि तीव्रतेबाबत जी माहिती जागतिक आरोग्य संघटना रोज प्रसिद्ध करते त्यातून कोविदच्या प्रसार आणि व्याप्ती संदर्भात विविध मानवी समाजव्यवस्था आणि वर्तणूक यांचे महत्व स्पष्ट होते. जागतिक आरोग्य संघटनेने २० जानेवारी 2020 पासून दैनिक वृतांत प्रसिद्ध करणे सूरु केले तेंव्हा कोविद१९ चे रूग्ण ४ देशांत आढळले पण त्याची व्याप्ती मुख्यत: चीनमध्ये होती. मात्र ही परिस्थिति झपाटयाने बदलत गेली. फेब्रुवारी अखेर ही साथ ५४ देशांत/प्रदेशांत पसरली तर १० एप्रिल पर्यंत तिचा प्रसार २१२  देशांत/प्रदेशांत झाला होता. इतरत्र साथीची तीव्रता वाढत गेली त्याप्रमाणात चीनचा वाटा सहाजिकच कमी होत गेला. अर्थात चीनने साथीविरोधात केलेल्या उपायांमुळेही चीनचा वाटा कमी झालाच. एप्रिल मात्र या आंकडेवारीचे महत्व ढोबळ स्वरूपाचे आहे. देशोदेशात रोगाची चांचणी करण्याचे प्रमाण आणि निकष जसे भिन्न आहेत त्या प्रमाणेच जाहीर केलेल्या आंकडेवारीच्या सत्यतेबाबतही शंका घेण्यास जागा आहे. चीन जाहीर करत असलेल्या रूग्ण आणि मृतांच्या माहितीबाबत जसा संशय प्रगट होतो त्याच प्रमाणे रोग चांचणीचे प्रमाणच जर अल्प असेल तर रूग्ण (आणि मृत व्यक्तीही ) कमी असतील हे उघडच आहे! पण माहितीचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध नसल्याने याच माहितीधारे रोगाचे स्वरूप वस्तुनिष्ठपणे जाणता येते.  तक्ता १ मधील माहितीतून रुग्ण आणि मृतांचा आंकडा वाढण्यातील झपाटा स्पष्ट होतो. फेब्रुवारीत रुग्णसंख्या जवळ जवळ १० पटीने वाढली तर मार्चमध्ये ती पुन्हा आठपट वाढली. नंतरच्या १० दिवसात रुग्ण संख्या पुन्हा दुप्पट झाली. मृतांची संख्याही याचपद्धतीने – फेब्रुवारीत महिन्यात १६ पट वाढ तर मार्च मध्ये ११ पट वाढ आणि नंतर दहा दिवसात दुपटीपेक्षा जास्त वाढली.  
                              तक्ता १: कोविद १९- जागतिक व्याप्ती आणि तीव्रता

जानेवारी २१, २०२०
जानेवारी ३०, २०२०
फेब्रुवारी २९,
2020
मार्च 31, २०२०
एप्रिल १०,
२०२०
लागण झालेले देश/प्रदेश
१९
५४
२०२
२१२
लागण झालेले एकूण रूग्ण
२८२
७८१८
८५४०३
७५०८९०
१४३६१९८
एकूण मृत व्यक्ती
१७०
२९२४
३६४०५
८५५२२
चीनचा वाटा (रूग्ण) (%)
९८.६
९८.९
९३
११
५.८
चीनचा वाटा (मृत व्यक्ती)(%)
१००
१००
९७
९.१
३.९
स्त्रोत: जागतिक आरोग्य संघटना कोविद 19 बाबतचे दैनिक अहवाल
        साथीची सुरूवात चीनमध्ये झाल्याने सुरूवातीला तिची व्याप्ति आणि तीव्रता चीनमध्ये दिसली. पण फेब्रुवारीत रोगाचा प्रभाव इतर देशांत दिसू लागल्यावर चीनचे आधिक्य झपाटयाने कमी झाले। सध्या एकूण रुग्णसंख्येत चीनचा वाटा 9% तर मृतांत तो ४% आहे. चीन मध्ये या साथीची पुन्हा एखादी लाट निर्माण होण्याची कायम शक्यता असली तरी या साथीचा फैलाव नजिकच्या काळात कसा होतो ते मुख्यत: इतर देशांतील परिस्थितीवर अवलंबून राहील. 
भिन्न सामना
        चीन मधील कोरोना विषाणू इतर देशांत गेल्या दोन महिन्यात पोचला. सर्वत्र सुरूवातीचा प्रसार परदेशी प्रवाशांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निगडित असला तरी नंतर साथीचा फैलाव अंतर्गत व्यापार/प्रवास आणि लोकांचे एकत्र येणे याच्याशी निगडित झाले. रोगाची लक्षणे (ताप,खोकला,श्वासाचा त्रास) नसलेल्या लोकांकडूनही संसर्ग शक्य असल्याने परिस्थिति बिकट बनते. शिवाय रोगाची तपासणी करण्याच्या सोयी मर्यादित असल्याने रोग प्रसार कोणाला झाले त्याचा सुगावा लागत नाही . देशातील नागरीकरण, गर्दीचे प्रसंग आणि वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता याप्रमाणेच रोग चांचणीचे प्रमाण आणि सुलभता या बाबीही विशिष्ट समुहांच्या जीवनपद्धतीचा भाग असल्याने रोग प्रसाराचा वेग, प्रमाण आणि तीव्रता सर्वत्र निराळी असते. शत्रुचा शिरकाव कसा/किती होतो आणि नंतरचा प्रतिकार (किंवा आत्मरक्षण!) विशिष्ट समाजाच्या क्षमतांवर अवलंबून रहाते. (तक्ता २) निवडक दहा देशांचा विचार करता युरोप आणि अमेरिकेत साथीचा मोठा फैलाव दिसतो. एकूण रुग्णांच्या तुलनेत मृतांचे शेकडा प्रमाण असा तीव्रतेचा विचार करता र जपान, कोरिया आणि जर्मनी यांची बचावक्षमता सर्वात परिणामकारक ठरली. तर फ़्रांस , स्पेन आणि इटली यांना जास्त हानी सोसावी लागली. अमेरिका, भारत आणि चीन यांची कामगिरी मध्यम स्वरूपाची म्हणावी लागते. 
                              तक्ता २: कोविद १९- देश प्रदेश
(माहिती १० एप्रिल २०२०पर्यंत)
देश
(१)
पहिला रग्ण आढळ  
    (२)
एकंदर रुग्ण
     (३)
मृत
 (४)
तीव्रता (%)
(४)/(३)
चीन
१ जाने
८३३०५
३३४५
४.०२
फ्रान्स
२५ जाने
८५३५१
१२१९२
१४.३
जर्मनी
२८ जानेवारी
११३५२५
२३७३
२.०९
जपान
२१ जानेवारी
५३४७
८८
१.६५
भारत
३० जानेवारी
६४१२
१९९
३.१०
इराण
२० फेब्रुवारी
६६२२०
४११०
६.२१
इटली
३१ जानेवारी
१४३६२६
१८२८१
१२.७३
कोरिया
२१ जानेवारी
१०४५०
२०८
१.९९
स्पेन
१ फेब्रुवारी
१५२४६६
१५२३८
९.९९
अमेरिका
२४ जानेवारी
४२५८८९
१४६६५
३.४४
एकूण

१०९२५९१
७०६९९
६.४७
स्त्रोत: जागतिक आरोग्य संघटना कोविद 19 बाबतच्या दैनिक अहवालाधारे
        साथीच्या रोगांचा प्रसार अनियमित असल्याने १० एप्रिलची माहिती पुढील कांही आठवड्यात बदलू शकते. पण अमेरिकेसारख्या संपन्न, बलशाली देशांत मोठी रुग्णसंख्या दिसते ही बाब तेथील जास्त व्यापक तपासणीचे गमक आहे का गतिमान सामाजिक अभिसरणाचा तो अटळ परिणाम आहे? जपान मधील मास्क वापरण्याची चाल आणि शिस्तप्रियता यांना जपानच्या यशस्वी बचावाचे श्रेय दिले मिळेल कदाचित पण आता तिथेही अधिक तीव्र निर्बंध लागू होत आहेत यावरून साथीची नवी लाट येत आहे का अशी शंका निर्माण होते. कोरियाने मोठ्या प्रमाणात चांचण्या करून प्रभावित व्यक्ती आणि त्यांच्याशी संपर्क झालेले संशयित यांचे विलगीकरण करत सौम्य निर्बंध राखत रोग नियंत्रणात राखला असे मानले जाते. त्याच पद्धतीने इटली, स्पेन आणि फ्रान्स मधील जीवितहानीची कारणे आणि निर्बंधांचे अर्थव्यवहारातील परिणाम यांचा सविस्तर विचार भविष्यात होत राहील. उर्वरित देशांपैकी इराण मधील परिस्थितीची तीव्रता सरासरीपेक्षा थोडीशी कमी आहे तर बाकी तीन मोठ्या देशांत (चीन, अमेरिका आणि भारत) रोगतीव्रता मध्यम मानता येते. निदान आजतरी.
युद्धबंदी का युद्ध समाप्ती ?
           वुहान प्रांतातील निर्बंध ७६ दिवसांनंतर शिथिल झाल्याने चीन मधील साथीला उतार पडला आहे असे मानून इतर देशातही तसेच होईल अशी सार्वत्रिक समजूत आहे. आणि तसेच व्हावे अशी सर्वांची इच्छाही आहेच!  पण करोनाचा गडद प्रभाव आणि परिणाम त्याच्या जलद प्रसारामुळे जी अनिश्चितता निर्माण होते त्यातून निर्माण होतो हे लक्षात घेता करोना विषाणूचा बंदोबस्त करणा-या प्रतिबंधात्मक औषधाचा शोध लागेपर्यंत साथीची ही लाट ओसरल्यानंतर पुन्हा सामान्य स्थिति निर्माण होईल का? करोना सोबतच्या युद्धाची ही कायमची समाप्ती असेल का ही फक्त तात्पुरती युद्धबंदी जिचा कधीही भंग होउ शकतो? कदाचित पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी? याबाबत अनिश्चितता कायम राहील. आणि मग करोनाबरोबर पुन्हा पुन्हा शक्य होणा-या चकमकींचा सामना करण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत काय बदल आवश्यक ठरतीत हा प्रश्न पुढे येतो. मास्क लावून, सतत हात धुवून गर्दी व वाहतूककोंडी न होता नित्य व्यवहार कसे करता येतील याचा सामुहिक विचार आणि नंतर त्यानुसार कृति आवश्यक ठरेल. आत्ताच्या परिस्थितीत टाळेबंदीला पर्याय नसेलही पण तो तात्कालिक उपाय आहे. जान आणि जहान दोन्ही राखण्याचे आव्हान सर्व जगासमोर असले तरी भारतापुढचे आव्हान जास्तच कठीण असेल याबाबत संशय नसावा.
***

Comments

  1. 'कोरोना'विरुद्धच्या लढाईचे व्यापक स्वरूप सांख्यिकी तपशिलासह स्पष्ट करणारा लेख. हातात शस्त्र, बचावासाठी ढाल आणि किती काळ लढायचे हे माहीत नसतानाही मानवजातीला हे महायुद्ध खेळावेच लागत आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोविद-१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ?

बँक एकत्रीकरणाचे संभाव्य परिणाम

आणखी एक बँक घोटाळा?