कवितेचा अर्थ




       CAA आणि NCR विरोधी निदर्शनांमध्ये फैझ अहमद फैझ यांच्या हम देखेंगे या कवितेचे वाचन/गायन करण्यात आले . अशा प्रसंगी गाणी, नाच अशा समूह कृति प्रत्यही केल्या जातात. या कवितेचा वापर होण्याचे मुख्य कारण असे की १९७९ च्या सुमारास लिहिलेल्या पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक़ यांच्या राजवटी विरोधी निदर्शनात तिचा वापर करण्यात आला. या कवितेवर पाकिस्तानात बंदी घातली गेली आणि सहाजिकच तिची लोकप्रियता वाढली. अनेक गायकानी ती गायली आहे. CAA आणि NRC ला विरोध करणा-याना ती का भावली 



हम देखेंगे
                 लाज़िम है कि हम भी देखेंगे                वो दिन कि जिसका वादा है
  जो लोह-ए-अज़ल[1] में लिखा है        जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां [2]
  रुई की तरह उड़ जाएँगे                हम महकूमों
[3] के पाँव तले
  ये धरती धड़-धड़ धड़केगी              और अहल-ए-हकम
[4] के सर ऊपर
  जब बिजली कड़-कड़ कड़केगी         जब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से
  सब बुत
[5] उठवाए जाएँगे               हम अहल-ए-सफ़ा[6], मरदूद-ए-हरम[7]
  मसनद पे बिठाए जाएँगे                 सब ताज उछाले जाएँग
  सब तख़्त गिराए जाएँगे                 बस नाम रहेगा अल्लाह
[8] का
  जो ग़ायब भी है हाज़िर भी              जो मंज़र
[9] भी है नाज़िर[10] भी
  उट्ठेगा अन-अल-हक़
[11] का नारा       जो मैं भी हूँ और तुम भी हो
  और राज़ करेगी खुल्क-ए-ख़ुदा
[12]          जो मैं भी हूँ और तुम भी हो
***
1. विधि के विधान 2. घने पहाड़    3. रियाया या शासित  4. सताधीश  5.  सत्ताधारियों के प्रतीक पुतले  6. साफ़ सुथरे लोग 7. धर्मस्थल में प्रवेश से वंचित लोग 8.  ईश्वर  9. दृश्य  10. देखने वाला  11. मैं ही सत्य हूँ या अहम् ब्रह्मास्मि 12.  आम जनता
संदर्भ: http://kavitakosh.org/kk/%E0%A4%B9%E0%A4%AE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87_/_%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BC_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A4%BC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BC

हे ही कविता वाचली तर सहज लक्षात येईल. मुळात मुस्लिम बहुल वाचक श्रोत्यांसाठी लिहिली असल्याने तिच्यातील प्रतिमा इस्लामशी संबंधित आहेत. उदा. बस नाम रहेगा अल्लाह का. मात्र हा इस्लामचा प्रचार / प्रसार नसून वर्तमान अन्यायी राजवट संपून न्याय प्रस्थापित होईल (रामराज्य?) हा आशावादच त्यातून प्रगट होतो. ज्या मुक्ति दिनाची कवीला आस आणि खात्रीही आहे तो प्रत्यक्षात येईल तेंव्हा काय काय होईल याचे वर्णन करताना सर्व राजमुकुट कोलमडतील, सिंहासने ढासतील, पुतळे उध्वस्त होतील आणि आम जनतेचे राज्य प्रस्थापित होईल असा विश्वास त्यातून प्रगट होतो. उर्दूचे फार ज्ञान नसलेल्या वाचकाला जो अर्थ प्रतीत होईल तो बहुदा वरप्रमाणे असेल. उर्दू भाषा आणि इस्लामी परंपरा यांच्याशी गाढ परिचय असेल तर अर्थाच्या आणखी भिन्न छटा दिसणे शक्य आहे. यातील काबा हा शब्द मक्का येथील काबा दाखवत नसून त्याने पृथ्वीचा निर्देश होतो तर बुत शब्दातून पूजेतील मूर्ती नव्हे तर जुलमी सत्ताधीशांच्या प्रतिमा, पुतळे यांचा निर्देश होतो. मूर्तिभंजनाचा पुरस्कार यातून होत नाहीच पण कवितेच्या अखेरीस अन अल हकचा जो उल्लेख आहे तो १०००/११०० वर्षपूर्वी  मंसूर अल हल्लाज या सूफी संताने प्रथम करत मी देव/सर्वश्रेष्ठ/बरोबर आहे असा दावा केला होता. हे कृत्य उघडच इस्लामी धर्म परंपरेविरूद्ध असल्याने यासाठी हल्लाज यांना आपल्या या बंडाची किंमत आपल्या जीवाच्या मोलातून द्यावी लागली. साहजिकच फैझ यांची ही कविता पाकिस्तानमधील सत्ताधा-यांना आक्षेपार्ह वाटली यांत कांहीच नवल नाही.
        CAA आणि NCR च्या विरोधात निदर्शने करणा-या IIT कानपूरच्या विद्यार्थ्याना ही कविता स्फूर्तिदायक वाटली यांतही कांही आश्चर्य नाही .मात्र IIT कानपूरच्याच एक प्राध्यापक वाशिमंत शर्मा यांना ही कविता  विद्यार्थ्यानी निदर्शन प्रसंगी गाणे आवडले नाही. कवितेचा अर्थ वाचकाना भिन्न पद्धतीने प्रतीत होउ शकतो. एखाद्या चित्राचा अर्थ काय याबाबत दर्शकात मतैक्य असेलच असे नाही आणि जरी असे झाले तरी चित्रकाराचा त्यापेक्षा निराळे व्यक्त करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता उरतेच!. कवितेत शब्दांचा वापर होत असल्याने मतभेदाच्या शक्यता कमी असली तरी ती शिल्लक रहातेच. पण प्रा शर्मा याना ती हिन्दु विरोधी वाटल्याने या प्रकाराला त्यानी आक्षेप घेत व्यवस्थापनाकडे दाद मागितली. प्रा शर्मा यांचे IIT मुंबई येथे शिक्षण झाले आहे. वैदिक धर्माच्या श्रेष्ठत्वाचा प्रचार करणा-या आणि याबाबतच्या अपप्रचारास विरोध करणा-या अग्निवीर संस्थेशी ते संबंधित आहेत अशी वृत्तपत्रीय माहिती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचे उच्च शिक्षण घेतलेल्या अध्यापकास ही कविता आक्षेपार्ह का वाटावी असा प्रश्न फैझ यांच्या पाकिस्तानस्थित नातू डॉ. अली मदीह हाश्मी यांना विचारला असता त्यानी तो हासण्यावारी नेत IITच्या अभ्यासक्र्मात साहित्य विषयाचा अंतर्भाव करावा असे गंमतशीर उत्तर दिले. प्रश्न फक्त कवितेचा अर्थ न समजल्याने उच्च विद्याविभूषित व्यक्तिने त्याबाबत आक्षेप घेण्यापुरता मर्यादित असता तर डॉ. हाश्मी यांच्याशी सहमत होण्यात कोणालाच कांही अडचण वाटली नसती. अटलबिहारी बाजपेयींसारखे एक कवि आज पंतप्रधान असते तर त्यांची या प्रकाराबाबत काय प्रतिक्रिया राहिली असती याची कल्पना करणे फारच मनोरंजक ठरेल.
        पण कविता हिंदु विरोधी असणे हा आक्षेप संस्थेच्या संचालकानी गांभीर्याने घेत या संदर्भात एक समिती नेमावी ही बाब अधिक चिंताजनक आहे. या समितीचा निर्णय काय असेल याबाबत तर्क करण्यात कांहीच अर्थ नाही. ही समिती कवितेचा अर्थ निश्चित करेल किंवा नाही याबाबत आज अंदाज करण्यातही कांही अर्थ नाही. एका कवितेवर ती हिंदु विरोधी असल्याचा आक्षेप घेणारी व्यक्ति हिन्दुत्ववादी कार्यक्रमाचा पुरस्कार करणा-या संस्थेशी संबन्धित असते आणि ज्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरले असते ती IIT सारख्या जागतिक स्तरावरील संस्थेच्या संचालकांनी अधिक चौकशी करण्यायोग्य समजावी यावरून हा प्रश्न अधिक गंभीर आहे हे स्पष्ट होते.
हिंदुधर्म विरोधी ?
        ही कविता हिंदू धर्म विरोधी असल्याच्या आरोपाच्या समर्थनात तीन ओळी आधारभूत आहेत असे मानले जाते. एका ळीत काबाचा उल्लेख आहे. मक्केतील काबा हे इस्लामपूर्व मूर्तिपूजकांचे महत्वाचे प्रार्थना स्थळ होते. दुस-या ळीत मूर्ति (बुत) हटवले जातील असा उल्लेख आहे तर तिस-या ळीत सर्वत्र अल्लाचे नाव पसरेल असा उल्लेख आहे. संपूर्ण कवितेचा विचार न करता कांही ओळीना महत्व देणे योग्य आहे का हा पहिला प्रश्न. काबा, बुत आणि अल्लाचे नाव होणे यांचा कवितेच्या एकत्रित अर्थाशी साजेशा अशा निराळ्या पर्यायी पद्धतीने विचार शक्य आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल. यापेक्षाही निराळा अर्थ कुणाला दिसेल/लावता येईलही. पण तो समग्र कवितेच्या संदर्भात करायला हवा. असे अनेक संभाव्य पर्यायी अर्थ असू शकतात हे मान्य करणे  हे हिंदु तत्वज्ञानाशी – ज्यात विविध, परस्पर विरोधीही मतांतरे समाविष्ट आहेत – जास्त जवळचे ठरते.  याउलट मला जाणवलेला अर्थच खरा, अंतिम आहे असे मानणे हे महंमद पैगंबर हे शेवटचे प्रेषित आणि त्याना प्राप्त झालेले कुराण हा परिपूर्ण ग्रंथ असल्याने त्यात बदल सुधारणा  शक्य नाहीत असे मानणा-या कडव्या इस्लामी परंपरेशी अधिक सुसंगत ठरेल.
        दुसरा मुद्दा हिंदु धर्मात प्राधान्याने मूर्तिपूजा होत असली तरी मूर्तिपूजा न करणारे, निर्गुणी उपासकही हिंदुच असतात. मूर्तिपूजकांत विविध प्रकारच्या मूर्ती पूजनीय ठरतात. कोणा एका देवतेचे श्रेष्ठत्व सर्व मूर्तिपूजक मान्य करताना आढळत नाहीत. देव अमान्य करणारे नास्तिकही हिंदु परंपरेचा भाग आहेतच. सर्व धर्म चांगलेच आहेत. आपल्या जीवनाचे नियंत्रण करणारी सर्वोच्च शक्ती एकच आहे त्याला कांही ईश्वर म्हणतात तर कांही अल्ला असे मानणा-या महात्मा गांधीना हिंदु परंपरेचा भाग मानण्यास हिंदु धार्मिक आचार्य कदाचित तयार होणार नाहीत. पण गांधीजी भारतीय परंपरेचा भाग तर आहेतच. या स्थितीत एखादी बाब हिंदु धर्म विरोधी आहे अशी सामान्य भूमिका घेणे कठिण आहे. शिवाय इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माप्रमाणे हिंदु धर्म सुसंघटित नसल्याने धर्म निर्णय करणारी सर्वोच्च, सर्वमान्य पीठ किंवा धर्माचार्य अशी पारंपरिक व्यवस्था नाही. त्यामुळे कोणा एका व्यक्तीला अमुक गोष्ट विविधतापूर्ण परंपरा असलेल्या हिंदु धर्माविरूद्ध आहे हे ठरविण्याचा हक्क प्राप्त होत नाही. प्रा. शर्मा यांच्या संदर्भात नेमलेली समिति जो कांही निर्णय घेईल तोही हिंदु परंपरेशी सुसंगत असेल का नाही हा प्रश्न खुला असेल.
           हिंदु धर्मात ज्या विविध सुधारणा झाल्या, मग ती आर्य समाज किंवा सत्यशोधक समाज अशा नव्या पंथांची स्थापना असो किंवा मंदिर प्रवेश, अस्पृश्यता निवारण या सारख्या चळवळी – त्याना हिंदु धर्माचार्यांचा बहुतेक वेळा विरोध होता. अशा विरोधात समाजसुधारकानी आपले कार्य चालू ठेवले. आणि ते अजूनही चालू आहेच. वर्तमान संदर्भात– फैझ अहमद फैझ यांची कविता हिंदु विरोधी आहे हा मुद्दा हिंदु परंपरा आणि धर्म यांच्या परीघातील नाही /नसावा. ही कविता हिन्दुत्व विरोधी आहे असा प्रा शर्मा यांचा मुद्दा असावा. तसे असेल तर त्याचा हिंदु धर्म आणि परंपरा आणि संस्कृती यांच्याशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. ही (राजकीय) हिंदुत्वाची मुख्यत: राजकीय भूमिका आहे. पण हिन्दुत्व विरोधी अशी स्पष्टता न आणता हिंदु विरोधी अशा मोघम शब्दप्रयोगातून हिंदु धर्माचा भास निर्माण करण्यात येतो. पण हिंदुत्वाचा हिंदु धर्माशी कांही संबंध नाही; ती एक राजकीय भूमिका आहे. हिंदुधर्मियांचे लोकसंख्येत ८०/८५ % प्रमाण असले तरी या सर्वांचा हिन्दुत्वाला पाठिंबा नाही. भाजपचे सर्व मतदारही राजकीय हिंदुत्वाचे समर्थक नाहीत. फैझ अहमद या मुस्लिम कवीच्या कवितेचा मुस्लिम बहुल निदर्शनात उद्घोष/उपयोग होतो ही बाब हिंदुधर्म विरोधी आहे असे भासवून हिन्दुत्ववादी भूमिकेची व्याप्ति वाढविण्याचा हा प्रयत्न आहे.
        CAANRC विरोधात फक्त मुसलमान आहेत हे खरे नाही . नागरिकत्व कायद्यातील बदल NRC सारख्या प्रकल्पांच्या संदर्भात मुख्यत्वे मुस्लिम समाजाला अडचणीचे ठरतील असा समज झाल्याने मुस्लिम युवक आणि विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणीय आहे. पण NRC च्या आसाम मधील प्रयोगावरून त्याचा उपद्रव हिंदु आणि मुसलमान अशा दोहोना झाला आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यावरचा तोडगा या स्वरूपात नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने याचा भविष्यात आपल्याला त्रास होईल ही मुस्लिम समाजाची भीती दूर करण्यास नागरिकत्व कायदयाच्या विरोधातील निदर्शने हिंदु विरोधी ठरविण्याने मदत होणार नाही.
        नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणारी जी निदर्शने झाली त्यात मुस्लिम युवक आणि विद्यार्थी यांचे आधिक्य होते. या निदर्शकानी राष्ट्रध्वज फडकावत, आंबेडकर आणि राज्य घटना यांचा घोष करत आपली चळवळ धर्माशी संबंधित नसून ती नागरिकत्व आणि आपले घटनादत्त अधिकार यांच्याशी निगडित आहे हे अधोरेखित करताना आपले मुसलमानपण लपविण्याचा प्रयत्न केलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निदर्शकांच्या पोशाखा चा उल्लेख केला होताच. मुसलमान असणे आणि भारतीय नागरिकत्व यांत विरोधाभास नाही हे खरेच पण मुस्लिम धर्मविषयक बाबी आंदोलनात वापरल्या तर त्याचा परिणाम नागरिकत्व कायदयाविरूद्धची चळवळ व्यापक बनण्यात अडथळा ठरेल ही बाबही मुस्लिम आंदोलक पुढे आणत आहेत. अल्ला हो अकबर ही घोषणा परमेश्वर (अल्ला) सर्वोच्च आहे असे अधोरेखित करते पण ती घोषणा वापरली तर मुस्लिमेतर आंदोलक सहभागी होणार नाहीत ही बाब मुस्लिम कार्यकर्ते विचारात घेत आहेत आणि तसे करण्यास इतर कार्यकर्त्याना सांगतही आहेत ही बाब इंडियन एक्स्प्रेसच्या पानांवरील एक माजी महिला पत्रकार आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठातील एक छात्रा यांच्यातील चर्चा निदर्शकांची मुस्लिम ओळख आणि नागरिकत्व कायदयाचा लढा व्यापक बनविण्याची गरज यावरील चर्चा मुस्लिम समाजात परिवर्तनाचे वारे कसे वहात आहेत याची द्योतक आहे. (पहा:  हयात फतेमा Not Just as Muslims इंडियन एक्स्प्रेस जानेवारी १३, २०२० आणि इरेना अकबर Why I Protest as Muslim इंडियन एक्स्प्रेस जानेवारी ३, २०२०).
        नागरिकत्ब दुरूस्ती कायदयाच्या विरोध करण्यातून मुस्लिम समाज आपल्या नागरिकत्व अधिकाराच्या रक्षणासाठी एकत्र येण्यास सुरूवात झाली आणि त्याला व्यापक पाठिंबा मिळाला तर तो एक सामाजिक लाभ ठरेल. आणि तसे झाले तर त्याचे श्रेय भाजपलाच जाईल त्यास जरी त्याची अपेक्षा नसली तरीही !!        
***

Comments

  1. खूप अभ्यासपूर्ण लेख आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर. सध्या ज्या बद्दल खोटी माहिती पसरवून सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम पसरवला जातो आहे, त्या बद्दल इतकी उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आणखी एक बँक घोटाळा?

कोविद-१९ विरूद्ध नागरीकरण/एकत्रीकरण ?